हिंदी भाषा ही भारतीय ज्ञान परंपरेचा स्रोत – डॉ. संजय कसाब

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

*हिंदी भाषा ही भारतीय ज्ञान परंपरेचा स्रोत – डॉ. संजय कसाब*

————————————-

पूर्णा (जंक्शन) प्रतिनिधी – हिंदी भाषा ही भारतीय ज्ञान परंपरेचा स्रोत असून जगातील सर्व प्रमुख भाषेतील ज्ञान हिंदी भाषेमध्ये आज उपलब्ध आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय कसाब यांनी केले.

ते स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा येथे हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी पखवाडा विशेष व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलताना प्रा. कसाब म्हणाले की, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ज्ञानाची कवाडे सर्व समाजासाठी खुली नव्हती म्हणून अनेक शतकापर्यंत एका मोठ्या समाज घटकाला ज्ञानापासून वंचित राहावे लागले. मात्र भारतीय स्वातंत्र्यानंतर सर्वांना कोणत्याही भाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला.

स्वातंत्र्यानंतर इंग्रजी भाषा ज्ञान परंपरेचा मुख्य स्रोत बनल्यानंतर त्या सोबतच हिंदी भाषा ही व्यवहार ज्ञानाचे प्रभावी माध्यम बनली. शिक्षणाच्या अभावामुळे हिंदी भाषेचे महत्त्व भारतीयांना समजायला उशीर लागला परंतू आज देशभर हिंदी भाषेचा लोक स्वीकार करत असून हिंदी भाषा प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेत असल्याचेही त्यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका मांडताना विभागप्रमुख प्रा. डॉ. भीमराव मानकरे म्हणाले की, राजकीय उदासीनतेमुळे हिंदी भाषेला राष्ट्रभाषाचा दर्जा प्राप्त होत नाही ही भारतीयांसाठी मोठी शोकांतिका आहे.

परंतु हिंदी भाषा ही प्रत्येक भारतीयांच्या हृदयात बसलेली असल्यामुळे ती जनभाषा बनली आहे . हिंदी भाषा हीच भारताची अधिकृत राजभाषा आणि राष्ट्रभाषा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे हे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, प्रत्येक भाषेतील ज्ञानाचे कण वेचून आपण ज्ञानी झालं पाहिजे. साहित्य हा समाजाचा आरसा

आहे त्यामुळे आपण साहित्य मोठ्या प्रमाणात वाचन करून ज्ञानाने संपन्न व्हावं.

या कार्यक्रमानिमित्त कु. तृप्ती किरगे, भूमिका सोळंके, शिवाजी पातळे, रेहान शेख, नंदिनी मोरे, राजेश सोलव यांनी संपादित केलेल्या बीजक भित्तिपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रभाकर सूर्यवंशी यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Comment