मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन आवश्यक – डॉ. पी.पी. चौकटे
——————————–
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाने घेतला पान, वेल, फुल, फळ आणि कंद अशा आगळावेगळा रानभाजी महोत्सव थाटात संपन्न..! 
सध्याच्या काळात रसायन मिश्रित भाजीपाल्यांच्या सेवनाचे आरोग्यावर ही दुष्परिणाम होत आहेत. ते दूर करण्यासाठी तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्याकरिता सर्वांनी रसायन विरहित रानभाज्यांचे सेवन करावे, असे आवाहन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व आयुर्वेदाचे तज्ज्ञ डॉ. पी.पी. चौकटे यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सव व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
या बाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक, कादंबरीकार तथा ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या दूरदृष्टीतून व अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सेवा योजना विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावर तालुका उपकृषी अधिकारी अशोक सोळुंके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आयक्यूएसी समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी, प्रमुख मार्गदर्शक प्रकाश चौकटे यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजक डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील, डॉ. सचिन गर्जे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या रानभाजी महोत्सवात पुढे बोलतांना प्रा. डॉ. चौकटे यांनी,तरवटा, गाढव काटा, गोखरू, तोंडले, वाघाटे, पटडी, कद्दू, तांदूळजा, दगडी शेपू, शेपू, चिंचेचा चिगोर, पाथरीची भाजी, बरवड्याची भाजी, कुंडलिका, चवळी, कर्टुला, गवार, बीज, उंबराच्या दोड्या, गवारी, अंबाडी, मटकी, मूग, खीरा, काकडी, करडीची भाजी, वालाच्या शेंगा, हिरवी मिरची, शिमला मिरची, ढोबळी मिरची, पोपटी मिरची, भेंडी, मेथी, शेवग्याच्या शेंगा, कांद्याची पात, फुलगोबी, पानगोबी , बटाटा, वांगे, देव डांगर, पडवळ, काकडी, दोडका, कडीपत्ता, पडची शेंग, गुळवेल, कारले, रानकारले, हिरवे कारले, हिरवी केळी, कवट, चमकुरा, राजगिरा, शेवगा, गरज फळ, सरकंद, मुळा, पालक, गुंज फांजीची भाजी, मुळाची भाजी इत्यादी ५८ प्रकारच्या भाज्या ठेवण्यात आल्या होत्या. या सर्व भाज्यांची माहिती दिली.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे अशोक सोळंके म्हणाले की, विषयुक्त भाजीपाल्या ऐवजी ग्रामीण भागातील रानावनातील रानभाज्यांना प्राधान्य दिले पाहिजे. रानभाज्यामुळे फॅट वाढत नाही आणि त्यामुळे माणूस आजारी पडत नाही असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, आपली ग्रामीण संस्कृती खऱ्या अर्थाने महान असून, या संस्कृतीने आयुर्वेदाच्या ही आधी मानवी जीवनाला आकार दिला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या निसर्ग संस्कृतीचा अभ्यास करावा तसेच नैसर्गिक सत्व असलेले खाद्यपदार्थ खाऊन आपली बुद्धिमत्ता तेज करावी आणि विद्यापीठांमध्ये आपली बौद्धिक चमक दाखवून गोल्ड मेडल मिळवावे असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक उपप्राचार्य प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन भूगोल विभागाचे प्रमुख कवी डॉ. दिगंबर माने यांनी केले तर आभार प्रो.डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते
