मुंबईतून ३५ तज्ञ डॉक्टरांची टीम दाखल आरोग्य शिबिरास पाहिल्यास दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईतून ३५ तज्ञ डॉक्टरांची टीम दाखल आरोग्य शिबिरास पाहिल्यास दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड दि. २६ :मुंबई येथील जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल आणि राजस्थानी एज्युकेशन सोसायटी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी विशेष आरोग्य शिबिराला प्रारंभ झाला. या शिबिराचा उद्देश मेंदूविकार व विकासासंबंधी अडचणी असलेल्या मुला–मुलींच्या तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.

या शिबिरासाठी मुंबईतून तब्बल ३५ तज्ञ डॉक्टरांची टीम नांदेडला दाखल झाली आहे. यामध्ये विशेषत: प्रसिध्द बालमस्तिष्करोग तज्ञ डॉ. इरावती पुरंदरे, डॉ. उद्धव, डॉ. अवि शाह, डॉ. आशा चिटणीस आदींचा समावेश असून समन्वयक रोशन कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वैद्यकीय पथक कार्यरत आहे.शिबिराच्या पहिल्याच दिवशी रुग्ण व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. मराठवाडा, विदर्भ, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमधून शेकडो रुग्ण तपासणीसाठी दाखल झाले. रुग्ण व त्यांच्या पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष कमल कोठारी, कोषाध्यक्ष जयप्रकाश काबरा, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, बनारसीदास अग्रवाल, अंकित अग्रवाल हे पदाधिकारी शिबिर स्थळी पूर्णवेळ कार्यरत आहेत.शिबिराच्या उद्घाटनावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, जि.प. समाजकल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार तसेच प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी दिलीप बनसोडे यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पालकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेविषयक माहिती देण्यात आली.

आरोग्य शिबिरात तपासणी झालेल्या प्रत्येक रुग्णाला आगामी सहा महिन्यांसाठी मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पुढील शिबिरापर्यंत रुग्णांचा उपचार अखंडित सुरू राहावा, यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.नांदेडमध्ये अशा प्रकारचे तज्ञांचे मोठे शिबिर आयोजित होणे, हे स्थानिक पालकांसाठी मोठा दिलासा मानले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील वंचित कुटुंबातील बालरुग्णांना अत्याधुनिक उपचार थेट मिळण्याची संधी मिळत आहे.

Leave a Comment