पूरग्रस्तांचे अश्रू आणि शहरातील दांडिया

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पूरग्रस्तांचे अश्रू आणि शहरातील दांडिया

गावोगाव पाणी शिरलंय. मराठवाड्यातील शेतकरी उभ्या पिकासकट वाहून गेला, पंजाबमध्ये हिरव्यागार शेतांचे चिखलात रूपांतर झालं, तर देशाच्या विविध कानाकोपऱ्यात नद्या तुफानी वेगाने वाहून संपूर्ण गावे जलमग्न झालीत. महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, आसाम – कुठल्याही राज्याचं नाव घ्या, सर्वत्र निसर्गाच्या रौद्ररूपाने हजारो कुटुंबांचे जगणे उद्ध्वस्त झाले आहे.

मातांच्या डोळ्यातील स्वप्नं वाहून गेली, मुलांच्या पोटातील भूक भागवणारे दाणे हरवले, शेतकऱ्यांच्या शेतातील पीक वाहून गेलं, जनावरं बुडून मेले. महामार्ग पाण्याखाली गेले, गावोगावचा संपर्क तुटला. लाखो लोक तात्पुरत्या निवाऱ्यात दिवस कंठत आहेत.

पण या विदारक दृश्यांमधूनही शहरातील चित्र पूर्णतः वेगळं आहे. नवरात्रीच्या नावाखाली डीजेचे गडगडाट, रंगीबेरंगी कपड्यांत सजलेली गर्दी, हजारो रुपये खर्चून खेळले जाणारे दांडिया-गरबा सोहळे… एकीकडे लोकांच्या अश्रूंना पुसायला कोणी नाही, आणि दुसरीकडे नाच-गाण्याच्या बेफिकिरीत शहरं झिंगलेली आहेत.

आज प्रश्न असा आहे – आपण एवढे असंवेदनशील झालो आहोत का?

मराठवाड्यात पूरग्रस्त शेतकरी उपाशीपोटी मुलांना शांतवतोय, पंजाबमधील शेतकऱ्याची पिकं वाहून गेलीत, आसाममध्ये गावेच नाहीशी झाली – तरीही आपल्याला त्यांच्या वेदनांना फुंकर घालण्याऐवजी डीजेच्या आवाजावर ठेका धरणं जास्त महत्वाचं वाटतंय का?

सण साजरे करणं चुकीचं नाही. पण सणाचा आनंद जर इतरांच्या वेदनांच्या किंमतीवर घेतला, तर तो आनंद नव्हे, तो केवळ संवेदनशून्यता आहे.

देवीची खरी पूजा ही दांडियाच्या रंगीबेरंगी वर्तुळात नाही, तर पुरग्रस्त आईच्या रिकाम्या हातात भाकर ठेवण्यात आहे.

देवीचा खरा आशीर्वाद तोच, जो एखाद्या अनाथ मुलाच्या डोळ्यात अश्रूंऐवजी हास्य आणेल.

आजची खरी गरज ही आहे की, शहरातील लोकांनी या पुरग्रस्तांच्या जखमांवर मलमपट्टी करावी. दांडियावर खर्च होणाऱ्या लाखो रुपयांतून जर गावोगाव अन्न, औषधं, कपडे पोहोचले, तर हाच सण देवीला सर्वात प्रिय ठरेल.

कारण देवीसमोर आरती गात बसण्यात नव्हे, तर दुःखात सापडलेल्या आपल्या बांधवांच्या आयुष्यात प्रकाश फुलवण्यात खरी नवरात्र आहे…. विचार… आंबेडकरी चळवळीतील छोटासा दवबिंदू सौ.संगीताताई आठवले ..

Leave a Comment