नांदेड महापालिका निवडणुकीसाठी रिपाइं (आठवले) पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची घोषणा

नांदेड -आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक विजयदादा सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ डिसेंबर (शुक्रवार) पासून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत.
महायुतीमध्ये सामील पक्ष म्हणून रिपाइं (आठवले) पक्षाला भाजपसोबत एकत्र लढण्याची इच्छा असली तरी, युतीसंदर्भात अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. तरीही स्थानिक पातळीवर संघटनात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. मरावाडा उपाध्यक्ष सुखदेव चिखलीकर, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम काळे, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष मिलींद शिराढोणकर आणि नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज प्रक्रियेची माहिती दिली.
युती झाली तर ०९ ते १० जागांची मागणी करण्याचा पक्षाचा मानस आहे. मात्र, सध्यातरी सर्वच प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज मागविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
अर्ज स्वीकारण्यासाठी पक्षाचे कार्यालय डॉ.आंबेडकर नगर, नांदेड येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्याचे आवाहन रिपाइं (आठवले) तर्फे करण्यात आले आहे.
