*स्पर्धा परीक्षा ही फक्त बुद्धीची नाही तर चिकाटीची परीक्षा असते – प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार*
—————————————-
पूर्णा (जंक्शन) प्रतिनिधी – स्पर्धा परीक्षा ही फक्त बुद्धीचीच नाही तर ती जिद्द आणि चिकाटीची परीक्षा असते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी केले.
ते येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात *स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्षातंर्गत* घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलत होते. 
याप्रसंगी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे, महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. भीमराव मानकरे, प्रा.डॉ.प्रभाकर सूर्यवंशी, व्यंकटराव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार म्हणाले की,
विद्यार्थ्यांनी परिश्रमाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी यशस्वी जीवनाचे संदर्भ शोधले तर परिश्रम आणि कठोर मेहनत करणारेच विद्यार्थी यशस्वी झालेले पहायला मिळतात.
जरी एखाद्या विद्यार्थ्यास अपयश आले तरी तो शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरुवात असते, म्हणून विद्यार्थ्यांनी हिंमत ठेवली पाहिजे. जो स्वतःवर विश्वास ठेवतो, तोच खरे यशाचे शिखर गाठतो असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे बालासाहेब देवणे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न करत आई-वडिलांच्या कष्टाचे वास्तव डोळ्यासमोर ठेवून स्वतःला ओळखले पाहिजे. मनाची तयारी ठेवून वेळेचे नियोजन व अभ्यासाची तयारी हीच यशाची गुरुकिल्ली असते असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. प्रभाकर सूर्यवंशी हे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आत्मविश्वास आणि नियोजनबद्ध अभ्यास हाच
आजच्या स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी आवश्यक असतो. केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही तर दिशा आणि नियोजनबद्ध परिश्रम करण्याची तयारी असली की यश हमखास मिळते. या वास्तवाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास हाच यशाचा मार्ग असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. वैशाली लोणे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय कसाब यांनी केले तर आभार प्रा.डॉ. मारोती भोसले यांनी केले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ भीमराव मानकरे, प्रा.वैशाली लोणे, प्रा.डॉ.संजय कसाब, महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
